मुलभूत गरजांसाठी शासनाच्या वेगवान निर्णयांमुळे दुर्गम भागात अपेक्षापूर्तीचा उत्साह – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार 28 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) : शासन सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान निर्णय घेत आहे, सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला वीज, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक सक्षमता, सामाजिक सुरक्षा, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध योजनांमुळे विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अपेक्षापूर्तीचा उत्साह दिसून येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज धडगाव येथे ठक्कर बाप्पा सभागृहात शबरी घरकुल प्रमाणपत्र व आदेश वाटप तसेच जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत बोलत होते.  यावेळी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके, उपसभापती भाईदास अत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, दिशा समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक अधिकारी, पदाधिकारी हे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित यावेळी बोलताना म्हणाले, सर्वांसाठी, रस्ते, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, आणि आता लोकांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठ्याचे ध्येय आहे, जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भारताच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ही योजना देशभर सुरू केली आहे. 15 ऑगस्ट, 2019 रोजी घोषित केलेली ही योजना 2024 पर्यंत प्रत्‍येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने, पुरेशा गुणवत्तेने नळपाणी पुरवठ्याची तरतूद करण्‍यासाठी राज्‍यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे. या योजनेतून कोणीही सुटणार नाही आणि सर्वात गरीब आणि उपेक्षित तसेच पूर्वी न पोहोचलेल्या सर्वांना खात्रीशीर नळ पाण्याचा पुरवठा केला जाईल. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे योजनेच्या आरंभाच्या आधी, ग्रामीण भारतातील पाणीपुरवठ्याचे मूलभूत घटक गाव/वस्ती होते. ‘जल जीवन मिशन’ ने आता प्रत्येक घराला पाणी पुरवठ्याचे मूलभूत घटक बनवले आहे.  विशेषत: आदिवासी,दुर्गम भागातील महिलांसाठी त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण अत्यंत गंभीर हवामान परिस्थितीतही त्यांना दूरवरून, दिवसेंदिवस घरासाठी पाणी आणण्याच्या जुन्या कष्टातून ही योजना मुक्त करणार आहे. ही योजना महिलांना स्वाभिमानाबरोबरच स्वयंप्ररणेची ऊर्जा निर्माण करणारी असेल, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

००००