यवतमाळ,दि.३१ (जिमाका) : नेरमधील कब्रस्तानात श्रद्धांजली भवनासाठी ९९ लाख रुपयांच्या कामांना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून श्रद्धांजली भवनाचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत ९९ लाख ७२ हजार २०० रुपयांच्या या कामांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. नगरपरिषदेमार्फत या श्रद्धांजली भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी सौंदर्यीकरणाची कामेदेखील केली जाणार आहे. नेर नगरपरिषद क्षेत्रात मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थानात श्रद्धांजली भवन उभारण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नातून जवळजवळ एक कोटी रुपयांचा निधी या भवनाच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन दिला आहे. या श्रद्धांजली भवनाचे बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामांचा दर्जा राखला जावा, अशा सूचनादेखील पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केल्या.
या भूमिपूजन समारंभाला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, नगरसेवक सुभाष भोयर, वैशाली ताई मासाळ, नगरसेवक तनविरखान शेरे अफगान खान, नगरसेविका आफरीन वाजीद खान, मुख्याधिकारी निलेश जाधव आदी उपस्थित होते.