नंदुरबार : दिनांक 7 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्त) – दिव्यांग बाधवांच्या कल्याणासाठी शासन संवेदनशील असून राज्यातील 17 आदिवासीबहुल जिल्ह्यातील आदिवासी दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय उपचार, विविध शस्रक्रियांचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाईल, अशी घोषणा आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली आहे.
ते आज नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, समाज कल्याण उपायुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तहसीलदार नितीन गर्जे, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे, परंतु एवढ्यावरच न थांबता जिल्हा नियोजन समिती व जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जाईल. तसेच राज्यातील आदिवासी बहुल 17 जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विनामुल्य उपचार, वैद्यकीय शस्रक्रियेसाठी तरतूद करताना आदिवासी विकास विभागाच्या ज्या योजनांमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश करता येईल त्या प्रत्येक योजनेत त्यांचा समावेश करून थेट त्यांच्यापर्यंत लाभ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय यंत्रणांना आपण गावनिहाय सर्वेक्षण करून प्रत्येक वंचितासाठी, दिव्यांगांसाठी काय गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामस्वरूप मधल्या काळात जिल्ह्यातील सुमारे तेराशे दिव्यांग बांधवांना विविध यंत्र व साहित्याचे वितरण करण्यात आले. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग बचत गटांना उभारी देण्याबरोबरच त्यांना समाजात, स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्यासाठी उभारी देण्याचे काम शासन, प्रशासनामार्फत करण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांगांचा उद्गार बनून प्रशासनाने काम करावे : ओमप्रकाश (बच्चू ) कडू
गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधवांचे नेतृत्व करत असताना त्यांची जीवनशैली जवळून पाहता आली. सर्वसामान्यांच्या जगण्याच्या कल्पनेपलिकडे दिव्यांगांचे जगणे आहे. आपल्या एखाद्या अवयवाला दुखापत झाली तर आपण तीव्रतेने आपल्या भावना व्यक्त करतो, पण दिव्यांग बांधवांना जन्मत:च एखादा अवयव नसतो ते निमुटपणे त्या कमजोरीची अपरिहार्यता स्विकारून जगण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा या अभावग्रस्त, नि:शब्द दिव्यांग बांधवांच्या जीवनात प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्यांचा उद्गार बनून काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी यावेळी केले.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केल्याबद्दल त्यांचे आभार मानताना श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे व दिव्यांगांसाठी स्वतंत्र पाच टक्के आर्थिक तरतूद करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांच्या संवेदना,भावना. गाऱ्हाणी मांडण्यासाठी दिव्यांगांसाठी सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्हास्तरावर सुरूवातीला कंत्राटी पद्धतीने अशा तज्ञाची नेमणूक करावी त्याचा नंबर सर्वत्र उपलब्ध करून दिला तर शासन, प्रशासन स्तरावरच्या दिव्यांग बांधवांच्या बहुतांश संवादातील अडथळे दूर होतील, त्यांच्या संवेदना, भावना थेट पोहचण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने एक दिवस दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी मदत होवू शकेल. दिव्यांगांसाठी शाळा, घरकुल, शॉपिंग मॉल यासारख्या संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुढे येत आहेत, वंचितांच्या विकासासाठी देशात नावारूपाला आलेला नंदुरबार जिल्हा येणाऱ्या काळात दिव्यांग विकासाचा आदर्श बनून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करताना शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य दिव्यांग बांधवांसाठी असल्याचे यावेळी दिव्यांग विभागाचे अध्यक्ष तथा आमदार श्री. कडू यांनी सांगितले.
‘विजय’ तर आहातच, पण खऱ्या अर्थाने तुम्ही ‘डॉ. विकास गावित’
या कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास व पालकमंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्य-कर्तृत्वाचा गौरव करताना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष श्री. कडू यांनी त्यांचा ‘डॉ. विकास गावित’ म्हणून उल्लेख केला. ते म्हणाले तुमच्या नावातच विजय आहे पण कामात तुमच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही डॉ. विकास गावित या नावाचे धनी आहात.
सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करणार
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक करण्याची मागणी कार्यक्रमात आमदार श्री. कडू यांनी केली. या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यालये, शासकीय आरोग्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनध्ये सांकेतिक भाषा तज्ञाची नियुक्ती करणार असून त्यासाठी तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्ह्यातील दिव्यांग कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची व नियोजनाची माहिती सांगून दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली.
यांना दिला जागेवरच लाभ
यावेळी मान्यवरांकडून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.
दिव्यांग जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान
♿️ विलास वसावे
♿️ श्रीमती रविताबेन विजय वसावे.
विविध यंत्रांचे वितरण
श्रवणयंत्र:
♿️गणेश वळवी
♿️ पियुष गावित
♿️ नैतिक वसावे
♿️ केतेश्वर गावित
♿️ तन्मय वळवी
♿️ अश्विन वळवी
♿️ विकास वसावे
व्हीलचेअर
♿️ वेदांत चौधरी
हॅंडीकॅप स्टिक
♿️ श्रावण चव्हाण
♿️भाऊसाहेब बच्छाव
व्यवसाय कर्ज वितरण
♿️ अरुणा पाटील
♿️ आशाबाई भिल
♿️कुसुमबाई पाटील
संजय गांधी निराधार योजना
♿️ मुद्दस्सर खान वाहीद खान
♿️ गिरीष वसावे
♿️ मृणाली बोरसे
♿️ संजय पावरा
आनंदाचा शिधा व इ–रेशन कार्ड प्रमाणपत्र
♿️ मोहम्मद खलील इस्माईल मोमीन
♿️विजय ठाकरे
शबरी आवास योजना
♿️गजमल वळवी
♿️ ताराबाई गावित
♿️ मुकेश पवार
♿️ निर्मला ठाकरे
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नवीन विहीरींसाठी अनुदान
♿️भावजी पाडवी
♿️ ठिबक संच : मदन बेलदार
♿️ ट्रॅक्टर : गणेश बावा