रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ७: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही, हे लक्षात घेऊन शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.

पुरंदर तालुक्यात भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, माजी आमदार अशोक टेकवडे तसेच दौलतनाना शितोळे, बाबासाहेब जाधवराव, जालिंदर कामठे, अंकुशराव जाधव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रामोशी व बेरड असा उल्लेख करून त्याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना सक्षम करण्याचे काम करण्यात येईल. शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराच्या संधी रामोशी समाजाला मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल.  आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रस्ताव तयार झाला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. रामोशी आणि बेरड समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, भटक्या आणि विमुक्त जातीतील १० ऐवजी ५० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समाजातील बेघर नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. दहावी नंतर व्यवसायिक शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहे उभारण्यात येत असून, याचा फायदाही रामोशी  आणि बेरड समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राजे उमाजी नाईक उत्तम संघटक व शासक

राजे उमाजी नाईक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे आपण स्वांतत्र्याचा अनुभव घेत आहोत. त्यांनी ५ हजार सशस्त्र सैन्य उभे करत इंग्रजांशी दिलेला लढा अंगावर रोमांच निर्माण करतो. वतनदार, सावकार यांना वठणीवर आणत त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. ते उत्तम संघटक व शासक हाते. त्यांच्या न्यायनिवाड्यात गरिबांचे कल्याण होते. क्रांतिकार्याचा पहिला शिपाई महाराष्ट्रात जन्माला आला हा संदेश मोलाचा आहे. इंग्रजांनी ज्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून ज्यांना शिक्षा दिली त्यामधील पहिले नाव म्हणून राजे उमाजी नाईकांची ओळख आहे, म्हणून त्यांना आद्यक्रांतिकारक म्हटले जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा गौरव केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इंग्रजाविरुद्ध लढा दिला

रामोशी समाज हा राज्याचा आणि देशाचा रक्षणकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उमाजी नाईकांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन परकीय सत्तेला हादरा दिला. त्यांनी १४ वर्ष इंग्रजांशी लढा दिला. या स्वातंत्र्यप्रिय समाजाने सुमारे ४०० वर्ष परकीय सत्तेला विरोध केला. ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी या समाजावर सोपवली होती. रामोशी समाजाने गावातील वतने अत्यंत निष्ठेने राखले. समाजातील एकोपा, एकसंधता प्रशंसनीय आहे.

स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातून स्वातंत्र्याची व स्वराज्याची सुरुवात

राजे उमाजी नाईक यांनी फेब्रुवारी १८३१ मध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दाखविलेली  दूरदृष्टीदेखील कौतुकास्पद आहे. या जाहीरनाम्यात इंग्रजांच्या नोकऱ्या सोडण्याचे, कर न भरण्याचे, इंग्रजी खजिन्याची लूट करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जनतेने देखील भक्कमपणे त्यांना साथ दिली. ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची व स्वराज्याची घोषणा होती, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आमदार श्री. पडळकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उमाजी नाईक यांचे मोठे योगदान आहे. देशातील गुलामीची खूण रामोशी समाजामुळे पुसली गेली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात रामोशी समाजामुळे क्रांतीची बीजे पेरली गेली. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी ५० लाख रुपये देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

आमदार श्री. कुल म्हणाले, रामोशी व बेरड समाजाच्या विकासाठी शासन प्रयत्नशील आहे. समाजाच्या विकासाठी महामंडळ स्थापन केले असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाआहे. येत्या अधिवेशनात या निधीमध्ये वाढ करण्याबरोबरच समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. कुल यांनी सांगितले.

यावेळी यशवंत शितोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.