कोल्हापूर, दि.8 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करुन पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर होणाऱ्या विकास व संवर्धन कामाचे भूमिपूजन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून ही कामे होणार आहेत. पंचगंगेचा जूना 60 मीटर व नवीन 55 मीटरचा घाट अशा एकूण 115 मीटर लांब घाटाचा विकास व पायरीचे 11 टप्पे या निधीतून करण्यात येणार आहेत. यातील 115 मीटरचे 5 टप्पे होणार असून 55 मीटरचे 11 टप्पे होतील. घाटाचा हेरिटेज लुक कायम ठेवून कामे गतीने करावीत, अशा सुचना करुन हे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
केवळ औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील विकासाबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास करणे आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिक कोल्हापूरला आला पाहिजे या दृष्टीने कोल्हापूरच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असे सांगून पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाच्या विकासाबरोबरच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आदी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहकार्याने कोल्हापूरचा विकास गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.