- नागरी भागाच्या सुशोभीकरणासह, स्मारकांचा विकास करणार
- ६ नगरपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देवून समस्यांबाबत घेतला आढावा
- नृसिंहवाडी पर्यटन स्थळ विकासासाठी ५ कोटी ९० लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कामे करण्यासाठी 6 नगरपंचायतींच्या मागणीनंतर नगरोत्थान व इतर योजनांमधून 21.3 कोटी रुपये निधी देण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने विविध योजनांमधून निधी दिला आहे. यातून पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हयातील भेटी दिलेल्या 6 नगरपंचायतींना सुमारे 21.3 कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी दोन दिवसात जिल्हयात 6 नगरपंचायतींना भेटी देवून सर्वसामान्यांच्या विकास कामांबाबतच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी सोबत खासदार धैर्यशील माने, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, संबंधित तहसिलदार, मुख्याधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि.8 सप्टेंबर रोजी त्यांनी वडगाव नगरपरिषद विकास कामांबांबत तेथील कार्यालयात बैठक घेतली. माजी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी विविध कामांबाबत शासनाकडे निधीची मागणी केली. नगरोत्थान व डीपीसीमधून मिळत असलेल्या 99 लक्ष रूपयांच्या निधीत वाढ करत पालकमंत्री यांनी 2.20 कोटी रूपये देण्याचे जाहीर कले. तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 8 कोटी रूपये लागणार आहेत. यासाठी शासनाकडून निधी येईपर्यंत काम थांबू नये म्हणून जिल्हा पर्यटन लेखाशीर्षमधून 1 कोटी रूपये देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. तेथील पंतप्रधान आवास योजनेसाठी 520 घरकुलांच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणेबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. हातकणंगले नगरपंचायतीत 1.38 कोटी रुपये निधी शासनाकडून मिळत होता, त्यात वाढ करत तब्बल 3 कोटी रूपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या सर्वच नगरपंचायतींना प्रोत्साहनात्मक शासनाकडून निधी मिळतो. त्याअंतर्गत ५ कोटी रूपये शासनाकडून अद्याप न मिळाल्याने त्याची मागणी यावेळी झाली. हातकणंगले नगरपरिषदेला तो निधी मिळण्यासाठी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हुपरी येथील नगरपरिषदेला स्व:मालकीची इमारत नाही, ज्येष्ठांसाठी विरंगूळा केंद्र, नगरोत्थानमधून वाढीव निधी मिळावा, पाण्याच्या योजनेबाबत तसेच सिटी सर्वेच्या दुरूस्तीबाबत मागण्या नागरिकांनी केल्या. यावेळी पालकमंत्री महोयदयांनी 83.5 लाख रूपयांच्या निधीत वाढ करत 2.10 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. ज्येष्ठांसाठीच्या विरूंगळा केंद्राच्या जागेबाबत 15 दिवसात जिल्हाधिकारी यांना ती जागा हस्तांतरीत करण्याच्या सूचना केल्या. नियमानूसार स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हुपरी येथील चांदी व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा करून येथील चांदी व्यावसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी नियोजन करू असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. सुर्य तलावाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी, चैत्यभूमी साठी नगर विकास विभागातून निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दि.9 सप्टेंबर रोजी जयसिंगपूर नगरपंचायत मध्ये आढावा घेताना माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामांबाबतची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच त्यांनी नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी व लागणाऱ्या निधीबाबतही माहिती सांगून वाढीव निधी मिळण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जयसिंगपूर नगरपंचायतीला मिळत असलेल्या 4 कोटी रुपये निधीमध्ये वाढ करून 8 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. पुढे शिरोळ नगरपंचायतीसाठी 2 कोटी रुपये, महाराणी ताराराणी स्मारकाच्या कामासाठी 50 लक्ष, नगरपंचायतीसाठी अग्निशमन वाहन व त्याकरिता शेड तयार करण्यासाठी पूर्वीच्या चाळीस लाखांमध्ये अजून 40 लाख असे मिळून 80 लाख व कुरुंदवाड नगरपंचायतीसाठी 5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. कुरुंदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळ स्मारकाला पर्यटनामधून सुशोभीकरणासाठी 1 कोटी निधी देण्याचे जाहीर केले. नृसिंहवाडी पासून धनाजी घोरपडे स्मारकापर्यंत नदी पात्रातून जाण्यासाठी अत्याधूनिक बोट देण्यात येणार.
नगरपंचायतींना भेटी देवून समस्या जाणणारे जिल्हयातील पहिले पालकमंत्री – खासदार, धैर्यशील माने
कोल्हापूर जिल्हयाच्या इतिहासात विविध विकास कामांबाबत, नागरिकांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष नगरपंचायतींना भेटून दौरे करणारे पहिले पालकमंत्री दिपक केसरकर असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, पालकमंत्री नेहमीच जिल्हास्तरावर बैठका घेवून विविध कामांबाबत चर्चा करत असतात. परंतू नागरिकांच्या भावना, त्यांच्या समस्यांची जाण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दिपक केसरकर स्वत: जावून नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा घेत आहेत. त्यांनी उपस्थितांना नागरी भागाचा विकास करताना समग्र विकास व्हावा यासाठी आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या नगरपंचायतींमधील विकास कामे व समस्यांबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथील विकासकामांचे भूमिपूजन रामलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर
श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथे जिल्हा नियोजन, पर्यटन स्थळ विकास योजनेतून मंजूर झालेल्या संरक्षक भिंत बांधणे व अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामांमध्ये 2 कोटी रुपये निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर कामांमध्ये शांतिनाथ मंदिर, सभा मंडप, कैलास पर्वत ते यात्री निवास रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच संपूर्ण कुंथुगिरी क्षेत्र परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. तेथील रामलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी 50 लक्ष रुपये देण्याचे जाहीर केले.
नृसिंहवाडीतील 5 कोटी 90 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा पुरवणे या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या 5.90 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नृसिंहवाडी येथे संपन्न झाले. या कामांमध्ये नृसिंहवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे व चौक सुशोभीकरण करणे, विठ्ठल मंदिर येथे सांस्कृतिक हॉल बांधणे, छत्रपती संभाजी महाराज विक्री केंद्र व भक्तनिवास बांधणे, श्री.स्वामी समर्थ मंदिर व शुक्ल तीर्थ मार्ग रस्ता करणे आणि सांस्कृतिक हॉल व भक्तनिवास बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन समारंभा वेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नृसिंहवाडी येथील सरपंच, उपसरपंच, तहसीलदार श्री. हेळकर, गट विकास अधिकारी श्री.कवितके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री.केसरकर म्हणाले ग्रामपंचायतीने पर्यटनाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने एक चांगला आराखडा तयार केला आहे. यावेळी त्यांनी धार्मिक व ऐतिहासिक संगम करून नृसिंहवाडी परिसरातील संताजी घोरपडे समाधी स्थळ, विठ्ठल मंदिर तसेच आजू बाजूच्या ठिकाणी जाण्यासाठी 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक नौका देण्याचे जाहीर केले.
यावेळी ते म्हणाले स्मारकांच्या संवर्धनातून छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजीराव जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह सर्व शूरवीर यांचा इतिहास पुन्हा जागृत करायचा आहे. त्यासाठी जिल्हयात अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
00000