मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम

मुंबई, दि. 12 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या संदर्भातील तयारीचा आढावा घेतला.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा तो इतिहास पुन्हा नव्या पिढीला कळावा, त्याकाळी निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन आठही जिल्ह्यांत ते आयोजित करावेत याबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आठही जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजनही औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात येणार आहे. याशिवाय, मुक्तीसंग्रामाचा इतिहास, तेथील हुतात्म्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, आझादी दौड, प्रदर्शन, व्याख्यानमाला, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हावा, मुक्तीसंग्रामातून मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल त्याला कळावे, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आठही जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा पोहोचावा, यासाठी त्यांनी सूचना दिल्या. प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधून तेथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्यांना सूचना केल्या. दिनांक 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यात यानिमित्त सप्ताहाभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/