धान भरडाईसाठीच्या दर सुधारण्यासाठीचा अहवाल सादर करावा – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुबंई, दि. 13 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाच्या भरडाईकरीता केंद्र शासनामार्फत दर निश्चित करण्यात आला आहे. या दराव्यतिरिक्त राज्य शासनाने इतर काही राज्यांप्रमाणेच अतिरिक्त दरवाढ करण्याच्या गिरणी मालकांच्या मागणीबाबत समाधानकारक तोडगा काढणार असून त्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

हंगाम 2021-22 व 22-23 मधील भरडाईच्या अनुषंगाने राइस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना निर्दैशित केले. बैठकीस आमदार राजू कारेमारे, तसेच गिरणी मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, धानाच्या भरडाईकरीता गिरणी मालकांच्या अडचणींबाबत विभागाचा सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये वाहतूकदर तसेच हमाली खर्चात प्रती क्विंटल दरवाढ करणे, गोदामाच्या ठिकाणी माल चढवणे तसेच वितरण केंद्रावर माल उतरवण्याच्या प्रक्रियेसाठीचा खर्च, बदलत्या इंधनदर, मजुरीदरानुसार त्यात काय बदल करता येणे शक्य आहे, या बाबींची तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधिताना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ/