उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
2

मुंबई, दि. १३ : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या पुरस्कार स्पर्धेसाठी  १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.१५.०९.२०२३ पर्यंत गणेशोत्सव मंडळानी अर्ज करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राज्य शासनाने, दिनांक १९ सप्टेंबर  पासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५.०० लक्ष, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लक्ष व तृतीय क्रमांकास रुपये १.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५,०००/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.०४.०७.२०२३ चा शासन निर्णय व दिनांक ३०.०८.२०२३ च्या शासन शुध्दिपत्रकात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमुद केले आहेत.सोबत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर यापूर्वी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते मात्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here