मुंबई दि. 13 : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठिशी उभे राहील. शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
संकट असले तरी पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा राहिली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, सोबतच शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात देखील आम्ही सहभागी आहोत, असेही यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.
००००