बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री मिट’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरात आयोजन

        नागपूर दि.16 : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार उद्या रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

             इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त  विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागपूर विभागातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांचेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या उपक्रमास कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कौशल्य विकास आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे यापूर्वी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            विभागातील नामांकित उद्योग विविध उद्योग संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांच्यामध्ये करार करण्याचे काम सुरु असून आजपर्यंत 700 पेक्षा जास्त उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे.  राज्यातील विविध विभागांमध्ये ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज, सेक्युरिटी एजन्सीज यांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उद्योगाची मोफत जाहिरात करणे,  उद्योगांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधने यासाठी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करुन देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे.   या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0712-2565479, 2531213 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

आयटीआयचा पदवीदान समारंभ

दुपारी एक वाजता कवीवर्य सुरेश भट सभागृहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राज्यस्तरीय पदवीदान समारंभ  होणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

            राज्य तसेच विदर्भ स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे.

00000