नंदुरबार : दिनांक 20 (जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना ‘मागेल त्याला मिळेल घर’ हे धोरण अवलंबले जाणार असून ग्रमीण आणि शहरी वाड्या, वस्त्यांमधील आपल्यातील विवध कला-कौशल्याच्या आधारावर गुजराण करणाऱ्या विविध पथकांना व्यवसायोपयोगी साहित्य देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते आज शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील विविध वाड्यावस्तांमधील नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगरसेवक प्रशांत निकम, विजय पाटील, शशिकांत पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आधार कार्ड, शिधा पत्रिका, बँक पासबुक काढण्यासाठी येणार खर्च आदिवासी विभाग करणार असून पुढील महिन्यात महिला बचत गटांच्या सभा घेऊन त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षणाबरोबर अनुदान देऊन त्यांना व्यवसाय उभा करून त्याला बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे. युवकांनाही व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी अनुदान दिले जाईल, बँड पथक, भजनी मंडळ, सोंगाड्या पार्टी आदींच्या कलाकौशल्याच्या उभारी देवून त्यांना व्यवसायासाठी पूरक साहित्य दिले जाईल. रोजगारासोबत आदिवासी परंपरा व संकृतीचेही जतन व्हावे, हा या निमित्ताने प्रयत्न राहील, शहराच्या प्रत्येक वॉर्डात सोयी, सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील विविध वस्त्यांमधून आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या मंत्री डॉ. गावित यांनी ऐकून घेऊन ज्या समस्यांचे जागेवरच निराकरण करता येणाऱ्या होत्या त्यांचे लगेच निराकरण पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात आले.