महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मोहिमेत सहभागासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ मोहीम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे, असे मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी प्रसिद्धीसपत्रकाद्वारे कळविले आहे.

नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग व नावीन्यता विभागातर्फे स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे भांडवल मिळणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांचा शोध घेणे व त्यांच्या उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ पुरविणे हे या योजनेचे मुख्य उद्द‍िष्ट आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड, दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड, तिसऱ्या टप्प्यात इन्क्युबेशन प्रोग्रॅमचा समावेश असेल. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे बक्षीसे मिळणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील उत्तम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, जिल्हास्तरावरील सर्वोत्तम १० विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीज भांडवल, राज्यस्तरावर सर्वोत्तम १० विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल. याशिवाय विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम, इतर योजनांचा लाभ आणि शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके मिळतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासनाच्या www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. सुरवसे यांनी केले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/