पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.२२: गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, खासदार पद्मश्री हेमा मालिनी, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, आमदार नाना पटोले, रवींद्र धंगेकर, पुणे फेस्टिव्हलचे  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,  मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, मीरा कलमाडी आदी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री श्री.महाजन म्हणाले,  सुरेश कलमाडी आणि या महोत्सवाचे घट्ट नाते आहे. ३५ वर्ष असा कार्यक्रम सुरू ठेवणे कठीण कार्य आहे. पण सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक या महोत्सवात सातत्य ठेवले. महोत्सवातील कार्यक्रम पाहता पुणे संस्कृतीचे माहेरघर असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे फेस्टिव्हलला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती असेही श्री.महाजन म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण झाली आहे. १९८९ पासून हा उत्सव सातत्याने सुरू आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर व्हावा यासाठी सुरेश कलमाडी यांनी खूप कष्ट घेतले, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात येऊन नृत्य सादर करणे ही गौरवाची बाब आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांत खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खासदार श्रीमती पाटील, श्री. बारणे, आमदार पटोले, पद्मविभूषणडॉ. के.एल. संचेती, उद्योगपती संजय घोडवत यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

श्री.कलमाडी यांनी स्वागतपर भाषणात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांना जीवनगौरव पुरस्काराने आणि उद्योगपती संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शतकपूर्ती वर्ष साजरे करणाऱ्या खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचादेखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ५० कलाकारांनी केलेल्या शंखनादाने झाली. पद्मश्री हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. नंदिनी राव गुजर यांनी तुलसीदास रचित गणेश स्तुती सादर केली. सानिया पाटणकर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी सुखदा खांडकेकर आणि सहकाऱ्यांनी  ‘नृत्य सीता’ हा रामायणातील सीता हरणानंतराचा प्रसंग नृत्य नाटिकेच्या माध्यमातून सादर केला.

नृत्यविष्काराच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. शर्वरी जमेनीस आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘हिस्टोरीकल  एम्पायर्स ऑफ इंडिया’ या नृत्याविष्काराला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रीयन मंडळ पुणेच्या खेळाडूंनी आर्टिस्टिक योगाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचे अप्रतिम सादरीकरण  केले. हेमा मालिनी यांच्या चित्रपट कारकीर्दीवर आधारित नृत्य सादरीकरणही यावेळी करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप लावणी फ्यूजनने झाला.