विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

0
2

मुंबईदि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच  शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

या मतदार नोंदणीसाठी पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईलवृत्तपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरलाद्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्रमांक १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून सदर मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदारसंघाचे अर्ज स्वीकारले जातील.

मागील निवडणुकीत सन २०१८ ला मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १८३५३ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ( नमुना १८) हा अर्ज असून त्यासाठी पुढील प्रमाणे अर्हता आवश्यक आहे. जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि तो १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी किमान ३ वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एक, तर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे.

मागील निवडणुकीत (सन २०१८) मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १८८९ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.

शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी (नमूना १९) हा अर्ज असून त्यासाठी पुढीलप्रमाणे अर्हता आवश्यक आहे. अर्हता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे. सर्व सामान्यपणे ज्या मतदारसंघाची रहिवासी आहे व जिने दिनांक १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी ६ मागील वर्षामध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. शैक्षणिक संस्थांची यादी पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी केलेल्या नमुना १९ मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत त्या शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here