अमरावती, दि.27 : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केले.
‘सेवा महिना’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅन कार्ड काढणे व दुरुस्ती करणे आदी विविध सेवांसाठी आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क प्रत्येकाला दिला आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी व देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थींनींना मतदानाचे महत्व पटवून देत मतदार नोंदणीबाबत व्यापक जनजागृती करावी. विभागातील प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव समाविष्ट होण्यासाठी विहित नमूना महसूल विभागाला सादर करावा, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी केले.
मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे मोहिम राबविण्यात येत असून वेळोवेळी शिबीरांचेही आयोजन करण्यात येते. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. आज आयोजित नोंदणी शिबीरात जिल्हा प्रशासनाकडून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. भारतीय निवडणूक आयोगाव्दारे मतदार नोंदणी व मतदार कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत इतरांनाही मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले.
या शिबिरात 300 विद्यार्थी उपस्थित होते. पैकी 210 लाभार्थ्यांची मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले असून, 50 जणांचे आधारकार्ड व पॅनकार्ड संबंधी नोंदणी करण्यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नियमितपणे मतदान करणारे शंभर वर्षीय दत्तात्रय लोमटे तसेच नवमतदार आराध्य गायकवाड व कु. मेहर गुप्ता आदींचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी प्रास्ताविकातून मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी आभार मानले. या शिबिरात शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.