स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 1  नऊ वर्षांपूर्वी, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागरुकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारतासाठी जबाबदारी घेण्यास प्रचंड उत्साह दाखवला. परिणामी, स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले आणि स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले, असे प्रतिपादन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार यांनी केले आहे.

ते आज नंदुरबार शहरातील अंधारे चौकात नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने आयोजित  ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, नागरिक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. ‘मन की बात’च्या 105 व्या भागात पंतप्रधानांनी आज (1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ) स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बापू जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना ‘स्वच्छांजली’ अर्पण करतील. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान या विषयावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, सर्वांनी वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत तुमच्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकता.

स्वच्छता पंधरवड्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी (दि. 1 ऑक्टोबरला ) स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येत  आहे.  या अभियानासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-2 चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपले उद्दिष्ट आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या काळात स्वच्छता पंधरवडा राबवायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी त्याचे नियोजन करा, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरच्या भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रिज टाकलेले असते. अशा महानगरपालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

अभियानांतर्गत सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्यावे. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे. पण, आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे, असे सांगत अभियानानंतर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून राज्यात जिल्ह्याचा पहिला  क्रमांक  कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी अंधारे चौकातील स्वच्छता अभियानात पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन ‘एक तारीख, एक तास’ मोहिमेचा शुभारंभ केला.

असे आहे एक तारीख,एक तासअभियान

या महास्वच्छता मोहिमेद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे जसे की बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक शहर, ग्रामपंचायत, नागरी विमान वाहतूक, रेल्वे,माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या शासनाच्या सर्व विभागांना,  सार्वजनिक संस्था नागरिकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्या कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देतील.सामाजिक संस्था,रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम, स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजिन केलेल्या असलेल्या संस्थांना पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा प्रशासन ऑनलाइन स्वच्छता ही सेवा उपक्रमा संबंधी https://swachhatahiseva.com/ या खास निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळावर सार्वजनिक माहितीसाठी स्वच्छता कार्यक्रम उपलब्ध आहेत. स्वच्छतेच्या ठिकाणी नागरिक फोटो काढू शकतात आणि हे फोटो पोर्टलवर अपलोडही करू शकतात. या पोर्टलमध्ये नागरिकांना, मोहिमेला वाहून घेतलेल्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छता दूत बनून लोकांच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करणारा विभाग देखील आहे.

दोन ऑक्‍टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा-स्वच्छता ही सेवा 2023 या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे. जुन्या इमारतींचे जीर्णोद्धार, जलकुंभ, घाट, भिंती रंगविणे, नुक्कडनाटके स्पर्धा आयोजित करणे अशा विविध स्वच्छता उपक्रमात नागरिक सहभागी होत आहेत. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत 6 कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.