पुणे, दि. १: स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हाती झाडू घेत श्रमदान केले. स्वच्छता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या देशाविषयीची प्रतिमा बदलत आहे, असे प्रतिपादन मंत्री श्री. पाटील यांनी केले.
यावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अनेक विषयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जोडून घेत त्याची लोकचळवळ निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या साडेनऊ वर्षांत सर्वसामान्यांना स्वच्छता मोहिमेशी जोडत आपल्या देशाची स्वच्छतेबाबतची प्रतिमा बदलली आहे.
आज शहरात साडेतीनशेपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात आला. यात दीड लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत हे या अभियानाचे यश आहे. सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था, कारखाने, स्वयंसेवी संस्था यात सहभागी झाले असून लोकसहभागाचे मोठे यश अभियानाला लाभले आहे. यातूनच स्वच्छतेची सवय निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये महापालिका परिसर, शनिवार वाडा, भिडे पूल आदी ठिकाणी पालकमंत्री यांनी सर्वांसोबत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छताविषयक शपथ दिली तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.