मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची  दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची  स्वच्छता न करता गल्ली बोळातील रस्ते, झोपडपट्टीतील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली. तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, उपायुक्त हर्षल काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील स्थानिकांना तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता गृहाची पालिकेच्या खर्चाने दुरुस्ती, डागडुजी करावी, दुरूस्ती न होऊ शकणारे शौचालये तोडून नव्याने बांधण्यात यावी. यादरम्यान फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने निधी उपलब्ध करून द्यावा. अस्वच्छता आरोग्यासाठी हानिकारक असून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर या मोहिमेची सुरुवात झोपडपट्टीपासून करणे आवश्यक आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार

मच्छिमारनगर येथील जेट्टी आणि परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच दुर्घटनाग्रस्त नौकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वच्छता मोहिम स्थानिक पातळीवर राबविणे गरजेचे आहे. मच्छिमारांना स्वच्छ रस्ते, पाणी, जेट्टी आणि परिसरात फूड कोर्ट बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कोळीवाड्याचे सुशोभीकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार असून कोळीवाडा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त चार नौकांची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी या नौकांसाठी नुकसान भरपाई म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगत असलेले भंगार उचलणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनी शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मार्चअखेर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे हे बधवार पार्क, मच्छिमार नगर-कफ परेड, बाणगंगा येथे स्वच्छता मोहिमेस उपस्थित राहिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यावेळी त्यांनी मच्छिमार सर्वोदय सोसायटीस भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.