स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता हीच सेवा अभियान व्यापक जनचळवळ बनावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि.1 (जि.मा.का.): स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेअंतर्गत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत मिरज वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मिरज वैद्यकीय महाविद्यालय परिसराच्या स्वच्छतेसाठी विद्यार्थी, मान्यवर नागरिकांचे अनेक हात राबले.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या परिसराची स्वच्छता नियमितपणे करावी. अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता हीच सेवा” हे अभियान व्यापक जनचळवळ  बनावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, माजी महापौर संगीता खोत,  डॉ. विनोद परमशेट्टी, सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. ताटे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचाच एक भाग म्हणून मिरज येथे ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध मान्यवर, शासकीय रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी  श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.