मुंबई, दि १:- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे (२ ऑक्टोबर) औचित्याने आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आज स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
यात अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देत श्रमदान केले. या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील व बाहेरील परिसर, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी टाऊन हॉल) परिसर, सेंट्रल लायब्ररी समोरील हर्निमन सर्कल व परिसरात तसेच क्षेत्रीय वन अधिकारी सागर माळी आणि मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने कुलाबा व शिवडी फ्री-वे येथील कांदळवन परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकुतें, तहसीलदार अतुल सावे, तहसीलदार प्रियांका ढोले, तसेच सुमारे 60 अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतला.