सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची तपासणी
अमरावती, दि. 5 : रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाव्दारे विभागात सर्वीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रुग्णालय आदी निर्माण करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने सुध्दा नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजूला तत्काळ उपचार सेवा पुरवाव्यात. याबाबत जिल्हा प्रशासनाने दररोज रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सेवा-सुविधांची तपासणी करुन नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातून महत्वाच्या राज्यस्तरीय आरोग्य विषयक व्हीसीला विभागीय आयुक्त ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सेवा-सुविधा, औषधींचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, उपकरणे, संसाधन, ओपीडी, आयपीडी रुग्ण यासंबंधी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, संदर्भसेवा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. मेढे, प्रशासकीय अधिकारी श्री. कावळे प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणे हे आरोग्य विभागाचे प्राधान्यक्रम काम आहे. त्यासाठी रुग्णालयात औषधींचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच सर्व आजारांचे वैद्यकीय तज्ज्ञ सेवेत उपलब्ध ठेवावे. डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छता मोहिम नियमितपणे राबवावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन गरजूंना त्याचा लाभ मिळवून द्यावा. रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांच्या गाऱ्हाणी व तक्रारींच्या निराकरणासाठी तक्रारपेटी दर्शनी भागात लावण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना व रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यात नियमितता राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज जिल्ह्यातील रुग्णालयांना भेट देऊन सेवा-सुविधांची तपासणी करुन नियमित आढावा घ्यावा. आवश्यक बाबींची पूर्तता संबंधित यंत्रणेकडून करुन घ्याव्यात, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची तपासणी
बैठकीनंतर डॉ. पाण्डेय यांनी शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा सुविधांची तपासणी केली. आयसीयुतील रुग्णांशी विभागीय आयुक्तांनी संवाद साधून उपचारासंबधी माहिती जाणून घेतली. ओपीडी-आयपीडी रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारीकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वाॅर्डातील रुग्णांची सद्यस्थिती याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून आढावा घेतला. शिवभोजन थाली व नातेवाईकांना बसण्यासाठी बाक आदी सुविधा लोकांना चांगल्या वाटल्याबद्दल त्यांनी रुग्णालयाचे कौतूक केले. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात सर्वच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालय परिसरात बसविण्यात यावेत, असे आदेश विभागीय आयुक्तांना रुग्णालय प्रशासनाला दिले.
0000