लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. ६ (जिमाका) : दिग्रस तालुक्यातील कलगाव, कांदळी येथील एकूण ६ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील, असे प्रतिपादन त्यांनी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.

यावेळी कलगाव येथील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राची नवीन इमारत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून शासनाचे उपक्रम राबवून परिसरातील गोरगरिब, महिलांना आधार द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॅा. आशिष पवार, तहसिलदार सुधाकर राठोड, माहिती अधिकारी पवन राठोड, गटविकास अधिकारी खारोडे, विविध विभागाचे अधिकारी, कलगावच्या सरपंच आस्मीता मनवर, कांदळीच्या सरपंच शेवकाबाई राठोड, कलगावच्या उपसरपंच साजेपरवीन अलीमोद्दीन शेखआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते व पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामे केली जात आहेत. विकासाची ही कामे अविरत सुरु राहील. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. होतकरू तरुणांसाठी ग्रामपंचायत तिथे अभ्यासिका, रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर, विविध योजनांमधून घरकुल, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी झटका मशीन, मागेल त्याला विहिर अशा विविध योजना, उपक्रम राबविल्या जात आहे. त्यातून लोकांची कामे केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कलगाव येथील तांदळी, आष्टा, कलगाव, वडगाव रत्यावरील पुलाचे बांधकाम, जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र नवीन इमारतीचे बांधकाम, श्री महादेव मंदिरासमोर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम, पंचमाता मंदिरासमोर सभागृहाचे बांधकाम, संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरासमोर सभागृहांचे बांधकाम, नळ जोडणी, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, नवीन विद्युत रोहित्र आणि स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम असे ४ कोटी ६३ लाख रुपये आणि कांदळी गावाजवळ पुलाचे बांधकाम, जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा, सिमेंट रस्ता, नळ जोडणी, नवीन रोहित्र उभारणी अशा २ कोटी एक लाख रुपये असे एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

काही दिवसांपूर्वी कांदळी येथील शेतकरी गणेश प्रल्हाद चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांना शासनमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वस्त केले.

०००