रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर पार्क’ व देवनार येथे ‘लेदर पार्क’ उभारणार – धम्मज्योती गजभिये

मुंबई, ‍‍दि.०६ :  राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. धारावी हे राज्यातील चर्मोद्योगांसाठीचे मुख्य केंद्र मानले जाते. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये मेगा  क्लस्टर पार्क व  मुंबई-देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम याबाबत श्री. गजभिये यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

श्री. गजभिये म्हणाले की, महामंडळाची सातारा, हिंगोली, दर्यापूर आणि कोल्हापूर येथे चार उत्पादन केंद्रे असून या केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या उत्पादन केंद्रात बूट, चप्पल व चर्मवस्तू उत्पादन करण्यात येते. नांदेड, जळगाव, वाशी, धुळे, सोलापूर, वांद्रे येथे सहा विक्री केंद्रे असून या विक्री केंद्राचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. सात विभागांमध्ये चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून दर्यापूर येथे पी.यू.टी.पी.आर प्लान्ट उभारण्यात येणार आहे. महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक चर्म प्रदर्शनात कोल्हापुरी चपलांचा ठसा उमटला आहे. महाराष्टातील चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी सीएलआरआय(CLRI) चेन्नई येथील चर्मोद्योग क्षेत्रातील संस्थेसोबत बेसलाईन सर्वेक्षण, लेदर क्लस्टर व प्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. महामंडळांतर्गत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येणार असून नव्याने ई-कॉमर्स पोर्टल तयार करण्यात येईल. विभागीयस्तरावर चर्मवस्तू प्रदर्शनाची योजना, नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळाचे संकेतस्थळ नव्याने तयार करण्यात येईल.

एफडीडीआय (FDDI) नवी दिल्ली यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणे, सीएफटीआय (CFTI )आग्रा व चेन्नई यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणे, असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.गजभिये यांनी दिली.

महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात. एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत लघु व्यवसाय योजना १ लाख रुपये, १.५० लाख व २.०० लाख, चर्मोद्योग २  लाख, लघुऋण वित व महिला समृध्दी प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज देण्यात येते. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघुव्यवसाय योजना ५ लाख लघुऋण वित्त व महिला समृद्धी योजना १.४० लाख तसेच  महिलांकरीता पाच लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याजदरात २ ते ३ टक्के योजनेनुसार सूट देण्यात येत आहे. तसेच बीज भांडवल कर्जावर देखील २ टक्के सूट देण्यात येणार आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झालेली असून देशात २० लाख व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत २५ हजार उमेदवारांना उद्योजकता प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.गजभिये यांनी सांगितले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ