जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे व गुलाल उधळणे टाळावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0
9

सोलापूर, दिनांक 9 (जिमाका) :-  राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

    यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,  पंढरीचा राजा विठ्ठल, सिद्धेश्वराची पावन नगरी, हुतात्म्यांचे शहर आणि ज्वारीचे कोठार असणा-या सोलापूरचा पालकमंत्री म्हणून कामकाज करण्याचे सद्भाग्य मला लाभले याचा मला सार्थ आनंद आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी मला सातत्याने आपल्या जिल्ह्यांतील जनतेशी भेटावे लागणार आहे.

      प्रत्येक भेटीवेळी आपल्या सर्वांचे प्रेम आणि सहकार्य मला लाभणार आहे याची भावना मनाला सुखावणारी आहे. तथापि, आपल्या सर्वाचे निर्वाज्य प्रेम आणि आदरापोटीच मी आपल्याला एक विनंती करणार आहे. आपल्या जिल्ह्यातील माझ्या भेटीवेळी आपण फटाके वाजविणे, गुलालाची उधळण करणे, पुष्पहार किंवा पुष्पगुच्छांची भेट देणे यासारख्या गोष्टी नागरिकांनी कृपया करु नयेत.

        या सगळ्या कृतीतून जरी माझ्याप्रती आपले प्रेम आणि आदर दिसून येत असला तरी फटके वाजविणे यासारख्या गोष्टीतून ध्वनीप्रदुषण आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा कृती जनतेच्या आरोग्यास हानीकारकच आहेत. त्याचप्रमाणे, गुलालाची उधळण, पुष्पगुच्छ, पुष्पहार यासाठीही आपला मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो व यथावकाश त्याचेही प्रदुषण आणि निर्माल्यच होत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपणांस अनाठायी खर्च होऊ नये आणि प्रदुषणामुळे आपले आरोग्यही धोक्यात येऊ नये अशीच माझी मनोमन भावना असते. माझ्या स्वागताप्रसंगी आपणाकडून होणारा टाळ्यांचा गगनभेदी गजरच माझी ताकद आणि अखंड प्रेरणा आहे.

     माझ्या सदर भावना आपण मोठ्या मनाने समजून घ्याल आणि माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल याच अपेक्षा आपणापुढे ठेवत आहे. आपण खुल्या दिलाने त्या पूर्ण करणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here