मुंबई, दि. १० : अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबई मंत्रालय येथे झाली. सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. १९ नियमित पदे व ६ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण २ कोटी १३ लाख ७६ हजार ४२४ रुपये इतका खर्च येईल.
कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण १३३६ प्रकरणे वर्ग होणार आहेत. राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे येथील प्रलंबित खटले निकाली निघून जनतेची सोय होणार आहे.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/