आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – मंत्री हसन मुश्रीफ

0
5

मुंबई दि. ११ : कोल्हापूरमधील आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आर्थिक मोबदला मिळण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी.  क्षेत्रातील इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे मोबदला देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने, राज्य पुनर्वसन प्राधिकरणासमोर अहवाल सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील आंबे-ओहोळ मध्यम प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रलंबित विषयासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त उपसचिव श्री. खटवाल, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा शिंगण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शक्ती कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, प्रकल्पही पूर्ण करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला तातडीने मिळावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागल्यास ती करण्यात येईल. नैसर्गिक न्याय तत्वाचा आधार घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना तातडीने मोबदला मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here