पुणे, दि. १३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करतांना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी क्रीडा विद्यापीठासाठी जागा निवडीबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे श्री.पवार यांनी सांगितले.
महाराणी सईबाई स्मृतीस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक संपन्न
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या उपस्थितीत महाराणी सईबाई स्मृतीस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार अतुल बेनके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वहाणे उपस्थित होते.
उत्खननात आढळलेल्या पुरातन वाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी २५ कोटी रुपये देण्यात येतील. वाड्याची जागा संपादन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. समाधी स्थळच्या विकासासाठी आराखडा ऑक्टोबर अखेरपर्यंत सादर करावा. दोन्ही ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांचाही आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
खेड तालुक्यात वाफगाव येथील होळकर किल्ला स्मारक विकासाबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले. या परिसरातील शाळा स्थलांतर व स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली.
प्रगतीतील इमारत कामांचा आढावा
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यातील प्रगतीतील सारथी कार्यालय, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय, अप्पर कामगार आयुक्तालय, कृषी भवन, रावेत येथील ईव्हीएम गोदाम या इमारतींसह सैनिकी शाळा सातारा इमारतीच्या कामांचा आढावा घेतला.
यासोबत मंजूर झालेल्या प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत, मोशी येथील फौजदारी न्यायालय इमारत, येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारत, ऑलिम्पिक भवन, मध्यवर्ती इमारत नुतनीकरण, उपविभागीय अधिकारीच व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सारथी प्रादेशिक कार्यालय व मुलामुलींचे वसतिगृह आदी कामांच्या प्रगतीबाबत आणि प्रस्तावित कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.
सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी. मंजूर कामे तातडीने सुरू करावी. सर्व इमारती बाहेरून सुंदर दिसतील आणि सर्व सुविधांनी युक्त असतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केल्या. मध्यवर्ती इमारतीचे नुतनीकरण करतांना तिचे जुने स्वरूप कायम ठेवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी आमदार अशोक मोहिते पाटील उपस्थित होते. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे इमारतींच्या कामाच्या प्रगती विषयी माहिती दिली.