नाविन्य आणि कौशल्यातून जिल्ह्याचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि.17: (जिमाका) बीड जिल्ह्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी नाविन्यपूर्णकल्पना आणि नवी कौशल्ये स्वीकारणे आवश्यक असून त्याकरिता अभ्यास आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्हा धोरणात्मक नियोजन बैठकीत म्हणाले.

या बैठकीस पालकमंत्री श्री मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अविनाश पाठक, यांच्यासह सर्व विभागातील विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित.

यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे उत्पन्न वाढीसाठी चर्चा केली.  यामध्ये बीड जिल्ह्यातील जमीन कोरडवाहू असल्यामुळे जायकवाडी तसेच कृष्णा खोऱ्यातून पाणी वळवून येथील शेततळे कसे वाढवू शकतात त्यावर अभ्यास करून  जी पीक घेतली जातात त्याच्याशिवाय इतर पीक घेता येईल यातून ही उत्पन्न वाढेल. यासह बांबू लागवड, सेरीकल्चर ( रेशीम लागवड ) हा नवा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येऊ शकतो. शेतकरी उत्पादन संस्था (एफ पी ओ )च्या माध्यमातून फळांचे रस डबाबंद करण्याच्या प्रक्रियेचा कारखान्यांचा समूह(cluster) उभारला जाऊ शकतो.

नवयुकांना  कौशल्यपूर्ण अद्यावत तंत्रज्ञान असणारे विविध अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकतात. बीड जिल्ह्यातील गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी अंबाजोगाई चे नाव प्रामुख्याने घेतले जाते त्याच्या आसपासचा परिसर हा यासाठी विकसित करता येऊ शकतो. “पीपीपी” मॉडेलवर मेडिकल कॉलेज सुरू करता येऊ शकते. यासह अन्य क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील ढाबे, मंगल कार्यालये यांचाही चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाढीसाठी उपयोग होऊ शकतो. जिल्ह्यात सौर उर्जेवर आधारित ग्रीन एनर्जी प्लांट च्या माध्यमातून जवळपास 1500 मेगा व‌‍‌‌‍‌ वॅट वीज तयार करता येईल . असे नवोपक्रम जिल्ह्यातील उत्पन्न वाढीसाठी सुरू करता येऊ शकतात, पर्यायी जिल्ह्यातील उत्पन्न वाढीसाठी भविष्यात नक्कीच वाढ होईल असा विश्वास सर्वांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर चर्चा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा ही सादर करण्यात आला होता. याअंतर्गत  कोळवाडी येथील श्री क्षेत्र पोहीचादेव, गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड, श्रीक्षेत्र कपिलधारा या तीर्थक्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

भाविकांना येथील मंदिरांच्या  दर्शनासोबतच पर्यटनाचा पण लाभ घेता यावा या पद्धतीने याचा विकास व्हावा असे मार्गदर्शन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील गौण खनिजाबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली बाधित आणि अबाधित क्षेत्रामध्ये आरोग्य, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधा बद्दल यावेळी चर्चा झाली.