जालना, दि. 20 (जिमाका) :- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबध्द आहे. गोरगरीबांच्या कल्याणाकरीता शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत, या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.
तर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना प्राधान्याने दिला जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
मेरी माटी, मेरा देश, अमृत कलश यात्रेचे उदघाटन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना लाभार्थींच्या मेळाव्याचे आज बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. दानवे तर उदघाटक म्हणून श्री. सावे यांच्यासह आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, तहसिलदार सुमन मोरे, गट विकास अधिकारी ज्योती राठोड आदी उपस्थित होते.
श्री. दानवे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात मेरी माटी, मेरा देश हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत देशातील प्रत्येक गावांतून माती जमा केली जात आहे. ही माती दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या शहीदांच्या स्मारकासाठी उपयोगात आणली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलीदान दिले आहे, त्यांचे स्मरण आजच्या पिढीला व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट तळागाळातील लोकांना व्हावा, हा उद्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे, असे सांगून श्री. दानवे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या. योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे, यासाठी जनधन योजना सुरु केली. गरीबांसाठी उज्ज्वला गॅस, प्रत्येकाच्या घरात शौचालय, मोफत धान्य यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळावा, याकरीता नुकतीच विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. सर्वसामन्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपूर्ण भारतात राबविण्यात आला. याचा समारोपीय कार्यक्रम म्हणून केंद्र शासन मेरी माटी, मेरा देश अभियान राबवित आहे. यामध्ये प्रत्येक गाव, शहरातील ग्रामस्थ व नागरिकांना आपल्या मातीविषयी जाणीव निर्माण व्हावी, तसेच स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आहुती दिली त्यांचे स्मरण व्हावे, या उद्देशाने आपले गाव व शहरातील जमा करण्यात आलेली माती दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या शहीदांच्या स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.
पालकमंत्री श्री. सावे पुढे म्हणाले की, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत बदनापूर तालुक्यातील 2 हजार 61 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मान्य झाले असून त्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 1 हजार 51 लाभार्थ्यांना रुपये 15 हजाराचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच निधी वितरीत करण्यात येईल. या लाभार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांनी आपल्या घराचे काम तात्काळ सुरु करावे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्यावतीने ओबीसी समाजासाठी मोदी आवास योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत, असे सांगून श्री. सावे म्हणाले की, राज्यातील 36 जिल्हयात ओबीसी समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुला व मुलींसाठी 72 होस्टेल बांधण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पालकांनी प्राधान्याने मुलींना शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार नारायण कुचे म्हणाले की, घरकुलापासून सर्वसामान्य व्यक्ती वंचित राहू नये म्हणून शासन घरकुलाच्या विविध योजना राबवित आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतंर्गत बदनापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी 27 कोटी इतका निधी मंजूर केला आहे, याबद्दल शासनाचे आभार. ज्या लाभार्थ्यांना निधी मिळला आहे, त्यांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, शासनाच्या घरकुलाच्या विविध योजना जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. घरकुलाचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. सर्वसामान्यांना घरकुल सहजपणे बांधता यावे, यासाठी प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून अनुदान वितरीत करण्यात आले. प्रारंभी मेरी माटी, मेरा देश अंतर्गत बदनापूर तालुक्यातील सर्व गावातून जमा करुन आणलेल्या मातीच्या कलाशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय, गायन, भाषण सादर केले. कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.