भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि.२४ : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. एफआरपी आणि साखरेचा दर ठरवतांना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कामकाज उत्कृष्टपणे सुरू असून असेच पुढेही सातत्य कायम टिकवून ठेवावे असे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे. इथेनॉल खरेदी करण्यासाठी दर निश्चिती केली असून त्यामुळे कारखान्यांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळेल. भीमाशंकर कारखान्यानेदेखील इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे.

भीमाशंकर कारखान्याने असलेला चांगला ताळेबंद टिकवून ठेवावा. परिसरात गुळाचे गुऱ्हाळ असण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. ऊसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी ऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत असून त्यांच्या अडचणी असल्यास त्या संचालक मंडळापुढे मांडाव्यात, त्या सोडविल्या जातील, असेही श्री.वळसे पाटील म्हणाले.

कारखान्याची ऊस गाळप क्षमता पूर्वी ६ लाख टन इतकी होती. परंतू कारखान्याचा विस्तार केल्याने गेल्यावर्षी गाळप क्षमता ९ लाख टन झाली असून शेतकऱ्यांनाही चांगला दर देवू शकलो. ऊस पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचा माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळून फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून एकरी शंभर टन ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. बेंडे म्हणाले, कारखान्याने वीज प्रकल्पातून ६ कोटी ८० लाख युनिट वीज निर्मिती केली. मागील वर्षी क्षमतेपेक्षा जास्त गाळप केले. यावर्षी १ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या दर्जाची साखर निर्माण करणार आहोत. येत्या महिन्याभरात इथेनॉल निर्मितीला सुरूवात होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस तोडल्या शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

श्री. गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण पूजन करण्यात आले. यानंतर गव्हाणात मोळी सोडून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.