‘शासन आपल्या दारी’ ५५ कक्षांच्या माध्यमातून योजनांबाबत मार्गदर्शन

यवतमाळ, दि. ३० : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांकडून ५५ कक्षांच्या माध्यमातून योजना- उपक्रमांची माहिती देण्यात आली. हजारो नागरिकांनी कक्षांना भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वितरण लाभार्थ्यांना झाले. यावेळी कृषी यांत्रिकीकरण अभियानात ट्रॅक्टर, कृषी अवजारे आदी लाभाचे वितरणही करण्यात आले.  परिसरात विविध विभागांकडून शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणारे ५५ स्टॉल उभारण्यात आले.

पोलीस, कामगार, महावितरण, महसूल, कृषी, मत्स्य व्यवसाय विकास, आदिवासी विकास, वने, बँक, समाज कल्याण, कौशल्य विकास, उमेद, परिवहन, माविम, उद्योग केंद्र, संजय गांधी योजना, पुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण‍ विभाग, महाऊर्जा आदी विभाग व महामंडळांनी कक्षाच्या माध्यमातून कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली.

कृषी विभागातर्फे शेतीसाठी उपयुक्त यंत्रे व अवजारे तसेच बी-बियाणे, लागवड, मशागत पद्धती, अद्ययावत संशोधन आदींची माहिती देण्यात आली, तसेच कृषी योजनांची माहिती पुस्तिकाही वितरित करण्यात आली. या स्टॉलला शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अग्रणी बँकेतर्फे जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फॉर्म भरून विमा काढण्याची सोय करून देण्यात आली.

समाजकल्याण कार्यालयातर्फे वंचित घटकांसाठीच्या योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कौशल्य विकास विभागातर्फे युवक-युवतींना नोकरीच्या संधी, रोजगार मेळावे व मुलाखत तंत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे उमेद, स्वयंसहायता समूहांसाठी उपक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

पोलीस विभागातर्फे सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध आदी विषयासंबंधी जनजागृती करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलवर जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगांसाठीच्या योजना व कृत्रिम अवयव साहित्य वितरण योजनेबाबत दिव्यांगांना माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण कार्यालयाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान, प्रधानमंत्री कुसुम योजना, शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप  आदींबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजक पुस्तिका, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कर्जसुविधा आणि त्यासंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली. खादी व ग्रामोद्योग महामंडळाद्वारे मधमाशीपालन व मधसंकलन, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या योजनांची माहिती देण्यात आली.

 जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेही कक्षाची उभारणी करण्यात आली होती. त्याद्वारे संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागाचे उपक्रम, निवडणूक, सेवा हक्क कायदा माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.

 

000