यवतमाळ, दि. ३ (जिमाका) : नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील एकूण ६ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी गावातील विविध विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास बाळासाहेब सोनोने, नामदेव खोब्रागडे, मनोज नाल्हे, वैशाली मासाळ, भाऊराव ढवळे, सरपंच, उपसरपंच, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी गावातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या समस्या, अडचणी तत्काळ सोडविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गावात विविध विकासाची कामे केली जात आहेत. सामाजिक बांधिलकीतून विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य, गोरगरिब आणि सर्व जातीधर्माच्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी विकासकामे केली आहे. यापुढेही जलसंधारण, घरकुल, पाणी पुरवठा, रस्ते, वीज आदी लोकोपयोगी कामे मार्गी लावली जातील, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांना संबोधित करतांना सांगितले.
कारखेडा येथे २ कोटी ४० लाख रुपये, सातेफळ येथे २ कोटी ४७ लाख रुपये आणि घारेफळ येथे १ कोटी १९ लाख रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
सातेफळ येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
पालकमंत्री संजय राठोड यांनी निधी उपलब्ध करुन दिलेल्या सातेफळ येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी सभागृहातील भगवान गौतम बुद्ध, डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
०००
पालकमंत्री बाईकने पोहोचले गावात
राज्याचा मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटले तर त्यांचा फौजफाटा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या ताफ्यात सुरक्षेच्यादृष्टीने पोलीसही आणि लोकांच्या प्रशासकीय स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी असतात. मात्र, हा संपूर्ण फोजफाटा बाजूला सारुन मंत्री संजय राठोड बाईकने गावात पोहोचले. ते दिग्रस तालुक्यातील राहटी, पेळू आणि इसापूर गावातील विकासकामाच्या भूमिपूजन व लोकार्पणासाठी दौऱ्यावर होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पेळू गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
000