आदिवासी बांधवांना कृषी व जोड धंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य; बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना देणार प्रोत्साहन – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार,दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त) : आदिवासी बांधवांसाठी कृषी व कृषिपूरक जोडधंद्यांसाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना, तसेच तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आदिवासी विकास विभागाच्या वतीने मोलगी व धनाजे येथे आयोजित महिला बचत गटांना शेळी गट निवड पत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (नाशिक), तसेच परिसरातील विविध यंत्रणांचे पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ.गावित म्हणाले, राज्यातील आदिवासी बहुल भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असून आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिने ज्या आदिवासी व्यक्तीकडे जमिन आहे, त्यांना कृषि साहित्य, बि-बियाणे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या शेतात विहिर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य करणे या सारख्या योजना राबविण्यात येणार असून ज्या आदिवासी व्यक्तींना मच्छिमारी व्यवसाय करावयाचा असेल त्यांना केज फिशिंग सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यांना जोड धंद्या म्हणून दुग्धव्यवसाय करावयाचा आहे, त्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देणे, ज्यांना बकरी पालनाचा व्यवसाय करावयचा आहे, त्यांना बकरी उपलब्ध करुन देणे, कृषि व कृषि विषयाशी संबंधित विविध योजना, शासनाचे इतर विभाग व आदिवासी विभागामार्फत सुरू करण्यात आल्या असून आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हाच त्यामागचा उद्देश असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

ते म्हणाले, येणाऱ्या 15 नोव्हेंबरला आपण भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभर जनजाती दिवस म्हणून साजरी करणार असून, या महान क्रांतीकारकांच्या नावाने आदिवासी वाडेपाडे जोड रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात बिरसा मुंडा जोडरस्ते योजनांसाठी भरीव तरतूद केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो आदिवासी पाडे हे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत.

यावेळी जि.प.अध्याक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वियवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाल महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

 

लक्षणीय

◼आदिवासी बांधवांना कृषि व जोड धंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य.

◼ बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना देणार प्रोत्साहन.

◼उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था यांचा पुढाकार.

◼शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार.

◼प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या कौशल्य विकासाची क्षमता बांधणी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार.

◼प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठही उपलब्ध करून देणार.

◼आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणाऱ्या भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेतून दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद.

◼कार्यक्रमात महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय.

 

0 0 0 0 0 0 0 0 0