संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रंगीत तालिम महत्त्वाची – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. ९ : सध्या हवामान बदलामुळे आपत्तींचे स्वरूप बदलत आहे. हे लक्षात घेता चक्रीवादळाच्या वेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये कोणत्या बाबींची प्रशासनाला तातडीने आवश्यकता आहे. आपत्ती कालावधीत अत्याधुनिक यंत्रणा कोणकोणत्या वापरता येतील याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तातडीने कळवावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज केल्या.

मंत्रालयातील आपत्ती विभागाच्या नियंत्रण कक्षात आयोजित सागर तटीय क्षेत्रातील रंगीत तालीमच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवादप्रणालीव्दारे मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाज, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे वरिष्ठ सल्लागार निवृत्त कमांडर आदित्यकुमार, एनडीआरएफच्या फाइव्ह बटालियनचे कमांडर एस. बी. सिंग, रवी सिंग, मत्स्य उपायुक्त महेश देवरे, रेल्वेचे उपअभियंता श्री.कुलकर्णी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई येथील  अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले की, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रतिसाद देण्याबाबत स्थानिक नागरिक तसेच प्रतिसाद यंत्रणा, शासकीय विभागांना सतर्क करण्याची प्रात्यक्षिके घेण्याची रंगीत तालीम आवश्यक आहे. अशा तालिमीमध्ये कोणकोणत्या बाबी आपत्तीवेळी आवश्यक आहेत याची माहिती प्रशासनाला कळू शकते. या रंगीत तालिमीमध्ये सैन्यदल, नौसेना, वायु दल, रेल्वे, तटरक्षक दल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरीटाइम बोर्ड, मत्स आयुक्तालय, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका इत्यादी अशा विविध केंद्र, राज्य व खासगी संस्था, प्राधिकरणांनी काटेकारेपणे काम केले ही स्तूत्य गोष्ट आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. धुळाज म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यात चार टप्यामध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. या रंगीत तालिमीमध्ये विविध केंद्र, राज्य व खासगी संस्था, प्राधिकरणे सामील आहेत. या निरनिराळ्या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून आपत्ती कालावधीत सर्वांच्या क्षमतांची पडताळणी करणे व आपत्तीच्या परिस्थितीत या संस्थांमार्फत प्रभावीपणे व समन्वयाने प्रतिसाद देणे हा मुख्य उद्देश आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री.धुळाज, अवर सचिव हिंतेंद्र दुफारे, कक्षाधिकारी संदीप कांबळे, नितीन मसळे, यूएनडीपीचे वरिष्ठ सल्लागार, श्रीदत्त कामत, प्रशासकीय सहायक संकेत घाणेकर यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला.

०००

संध्या गरवारे/विसंअ