मराठवाडयासाठी एलआयसीच्या सेल्स ट्रेनिंग सेंटरची निर्मिती – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.21:- मराठवाड‌्या‌त एलआयसीने अत्यंत चांगले काम केले असून मराठवाड्याच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर सुरू करणार असल्याचे प्रतिपादन केंद्र‍ीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. एलआयसीच्या सर्वसामान्य नागरिकांना जीवन विमा कवच देण्याऱ्या नाविण्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

वंदे मातरम सभागृह येथे एलआयसीच्या वतीने आयोजित मेळाव्यात डॉ. कराड बोलत होते. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक एम. जगन्नाथ,विभागीय व्यवस्थापक कमल कुमार, मार्केटिंग व्यवस्थापक श्रीमती अरविंद शिंधू, संजय रामधरे उपस्थित होते.

डिजीटल व्यवहारात आपला देश अव्वलस्थानी असल्याचे केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका, एलआयसी, जीएसटी,शेती, उद्योग यासह विविध क्षेत्रांत चांगले काम झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर घेवून जाण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात चांगले काम होणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व क्षेत्रांनी आपल्या क्षेत्र प्रगती होईल, असे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारचे विमा आहेत, त्यात जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. 1 सप्टेंबर 1956 रोजी एलआयसीची सुरूवात झाली आणि देशातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना विश्वासाचा आधार मिळाला. मराठवाडयात एलआयसीने यापुढेही आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी. यामध्ये एजंट व विकास अधिकारी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.  मराठवाडयातील निलंगा, उमरगा, माजलगाव यासह ज्याठिाकणी एलआयसीच्या मालकीच्या इमारती नाहीत तिथे इमारती उभ्या करण्यासाठी आपल्याकडूनही सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. कराड म्हणाले.

एलआयसीने नाविण्यपूर्ण विमा योजनांची सुरूवात केली असून यापुढेही नागरिकांना आधार देणाऱ्या विमा योजना देत विमा योजनांची व्याप्ती वाढवा. नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासोबतच कागद विरहीत कामकाज वाढवावे लागणार आहे. यासाठी एजंट, विकास अधिकारी यांनी योगदान द्यावे, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले.

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले, एलआयसीच्या विविध योजनांची व्याप्ती वाढविण्यासोबतच नागरिकांना लाभदायी ठरतील अशा नाविण्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यावर आपला भर असणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित विविध योजना, डिजीटल व्यवहार, दर्जेदार सेवा, कागद विरहीत कामकाज, बाजारपेठेच्या गरजेप्रमाणणे योजना याच बाबींना एलआयसीच्या कामकाजात सर्वाच्च प्राधान्य असणार आहे.

यावेळी एलआयसीच्या वतीने चांगले काम करणाऱ्या एजंट, विकास अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड, अमरावती, पुणे, नाशिक मंडळातील एजंट, विकास अधिकारी व एलआयसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*****