डॉ. रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरच वन संवर्धनाचे कार्य महत्त्वपूर्ण -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : निसर्ग विविधतेने नटलेला आहे. या निसर्गातील वन्य प्राण्यांचे डॉ. रमाकांत पांडा यांनी केलेले छायाचित्रण कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या बरोबरच त्यांनी सुरू केलेले वन संवर्धानाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रसिद्ध हृदय विकार शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी भारतातील पेंच, जिम कॉर्बेट, सातपुडा, ताडोबा, बांधवगड या व्याघ्र प्रकल्पांसह केनिया, दक्षिण आफ्रिका, टांझानियाचा प्रवास करून सिंह, वाघ, हत्ती, बिबट्यासह वन्य प्राण्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, डॉ . रमाकांत पांडा, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीनाथ के. ए. आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. पांडा हे देशातील प्रथितयश हृदय शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ आहेत. त्यांनी निसर्ग, वन्य प्राणी, पशु पक्षी यांचे केलेले छायाचित्रण सुंदर आहे. त्यांनी निसर्गाचे छायाचित्रण करण्याबरोबर संवर्धनाचे काम केले आहे. ते अनुकरणीय आहे. यावेळी  डॉ. पांडा यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.

 

0000