घराचे स्वप्न साकारण्यासाठी ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने वांद्रे- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘नारडेको’चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘नारडेको’ने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.

बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी ‘ महारेरा ‘ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावे, अशीही सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.

यावेळी श्री. रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000