मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – उद्योगमंत्री उदय सामंत

ठाणे, दि.01 (जिमाका) :- हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावे आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

लक्ष्यवेध इन्स्टिटयूट आयोजित ठाणे येथील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी “बिझनेस जत्रा २०२३ – सोहळा उद्योजकतेचा, उत्सव महाराष्ट्रीय लघुउद्योजकांचा..!”  या बिझनेस जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही बिझनेस जत्रा दि. 1 आणि 2 डिसेंबर 2023 रोजी, टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे सुरु असणार आहे.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, संजीव नाईक, ॲड.संदीप केकाणे, श्री.अरुण सिंह, श्री. निनाद जयवंत, श्री. निलेश सांबरे, श्री. गणेश दरेकर, अतुल राजोळी, डॉ. अतुल राठोड हे मान्यवर उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभिर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत गेल्या वर्षात 5 हजार 16 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या नऊ महिन्यात 13 हजार 256 नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत 1 कोटी 37 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. रत्नागिरीत कोकाकोला चा पहिला मोठा प्रकल्प उभा करीत आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कोका-कोला च्या सीईओंना सांगितले की, आमच्याकडे तज्ञांपासून ते कामगारांपर्यंत सर्व काही आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका-कोला च्या सीईओ नी 1 हजार 500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.

गडचिरोली सारख्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रकल्प उभा राहत आहे. तेथे सर्वात मोठी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहणार आहे. यासाठी 5 हजार एकर जागा भूसंपादित केली जाणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अत्यंत प्रयत्नशील असून ते यशस्वी सिद्ध झाले आहेत.  स्मॉल स्केल इंडस्ट्री बळकट होण्यासाठी शासनही पूर्ण क्षमतेने नवउद्योजकांच्या पाठीशी उभी आहे, यापुढेही राहील असे सांगून श्री. सामंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना राज्यात मिशन मोड मध्ये राबविली जाईल. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून देश निश्चितच बलवान होईल. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात लघुउद्योजक तयार होतील. ही योजना राबविण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी लागलीच मंजूरही केला आहे. यातून गावेही बळकट होतील.

या बिझनेस जत्रामध्ये व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई चे सहसंचालक श्री. गावित, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, ठाणे महेश जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागाचेही स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनास उभारण्यासाठी आयटीआय, वागळे इस्टेट च्या प्राचार्य श्रीमती माने, आयटीआय मुलींची, कोपरी, ठाणे च्या प्राचार्य श्रीमती सरला खोब्रागडे, शिल्प निदेशक श्रीमती शर्वरी दुर्गाळे, सुधाकर राठोड, आशिष बावचिकर, शिवाजीराव पालव, प्रशांत घनघाव यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

बिझनेस जत्राचे हे तिसरे पर्व असून, या उपक्रमाचे MSME क्षेत्रात आणि महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये विशेष स्थान आहे. बिझनेस जत्रा 2023 साठी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड Joy e-bike मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत.  त्याचप्रमाणे Quik Shef, Urban Ayureved, Voltas Air Conditioners आणि पितांबरी उद्योग समूह यांनी सहप्रायोजकत्वाच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले आहे.

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये 120 पेक्षा अधिक उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल, 10 हजार पेक्षा अधिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC), लघु सूक्ष्म मंत्रालय (MSME), राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC), ठाणे महानगरपालिका, विविध बँका आणि 50 हून अधिक व्यावसायिक संघटनाचे विशेष सहकार्य बिझनेस जत्रा 2023 साठी लाभले आहे.

बिझनेस जत्रा 2023 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ( MIDC ), लघु सूक्ष्म मंत्रालय (MSME) अधिकारी, कौशल्य विकास मंत्रालय मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा या सर्वांचा सक्रिय सहभाग असणार आहे. बिझनेस जत्रा 2023 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीचे व्हिजन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध उद्योगस्नेही धोरणांचे आणि योजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.तसेच कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सहायता निधी योजना व उपक्रम याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

बिझनेस जत्रा 2023 मध्ये Industry 4.0, ब्रँडींग, महिला उद्योजकता, व्यावसायिक संघ व्यवस्थापन, व्यवसायाचे आर्थिक नियोजन आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना यासंदर्भात चर्चासत्र आणि परिसंवादाच्या माध्यमातून दिग्ग्ज व्यक्तींचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्योग तथा अन्य क्षेत्रातील दिग्ग्ज व्यक्तींच्या हस्ते नवीन उत्पादने व सेवा यांचे अनावरण करण्यासाठी बिझनेस जत्रा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून यंदाही Lahs Green India Pvt Ltd निर्मित विशेष सेवेचे – Tow – Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go चे अनावरण करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने Tow – Go या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

000