मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये होणार चर्चा

मुंबई, दि. 01- टुना मत्स्यपालन क्षेत्रात सुधारित आणि सुयोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज हिंद महासागर टुना आयोगाच्या (इंडियन ओशन टुना कमिशन) मुंबई येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आली. या परिषदेत सहभागी असलेल्या विविध देशांच्या मान्यवरांनी आज भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेट दिली. दरम्यान, आयोगाच्या मुख्य वैज्ञानिक समितीची बैठक हॉटेल सेंट रेजिस येथे 4 ते 8 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सुरुवात होणार आहे. ट्युना आणि शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित वैज्ञानिक शिफारसींसंदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे.

केंद्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने 28 नोव्हेंबरपासून इंडियन ओशन टुना कमिशनच्या 19 व्या डाटा संकलन आणि सांख्यिकी बाबतच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस सुरुवात झाली. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहसचिव नितुकुमारी प्रसाद, केंद्रीय मत्स्यव्यवसाय उपायुक्त संजय पांडे, राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहआयुक्त महेश देवरे यावेळी उपस्थित होते.

जगभरातील टुना मत्स्यपालन क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र आणणारी ही आंतरराष्ट्रीयस्तरावरील आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक आहे. ट्युना आणि इतर मोठ्या पेलाजिक प्रजाती, जसे की बिलफिश, शार्क आणि रेस यांचे मत्स्यव्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्व आहे.  यात टुनाचा मोठा वाटा आहे. या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्याप्तीसाठी बहुराष्ट्रीय मत्स्यव्यवसायाद्वारे अति मासेमारी करण्याची त्यांची संवेदनशीलता लक्षात घेता, सुधारित व्यवस्थापन आणि मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी सर्व राष्ट्रांच्या सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

या बैठकीकरिता इंडोनेशिया, फ्रान्स, स्पेन, युरोपियन युनियन  देश, सेशेल्स, टांझानिया, इराण, थायलंड, जपान, श्रीलंका, ओमान आणि भारत या देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय, इतर विविध देशांतील अनेक प्रतिनिधी आणि वैज्ञानिक संस्था दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे देखील बैठकीला उपस्थित आहेत.

मत्स्यव्यवसाया संदर्भातशास्त्रज्ञ विविध देशांनी केलेला डेटा संकलन, आणि आयोगाला अहवाल देण्यासाठी अवलंबलेल्या विद्यमान वैज्ञानिक पद्धतींवर विचारमंथन आणि विश्लेषण करत आहेत आणि हिंद महासागर क्षेत्रातील डेटा/माहिती संकलन आणि आकडेवारीच्या प्रगत आणि सरलीकृत पद्धती तयार करणार आहेत.

आजच्या बैठकीनंतर प्रतिनिधींच्या भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेटीचे नियोजन सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय माने, मत्स्य व्यवसायविकास अधिकारी अशोक जावळे यांच्यासह नीरज चासकर, रवी बादावार, निखिल नागोठकर, दीपाली बांदकर, सागर कुवेस्कर यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. या भेटी दरम्यान मान्यवरांनी तेथील नौकांची पाहणी केली तसेच टुना/ कुपा हा मासा किती प्रमाणात बाजारात येतो. त्याची मासेमारी याची पाहणी केली. भाऊच्या धक्क्यालगत उभ्या असलेल्या बोटींची आणि शाश्वत पद्धतीने मासेमारी बाबत माहिती घेतली. भाऊच्या धक्क्यालगत लिलाव सभागृह, मासेविक्री बाजार व्यवस्था, इंधन पुरवठा याचे व्यवस्थापन याची पाहणी करुन त्यांनी सूचनाही केल्या. नौका मासेमारी करुन आल्यानंतर मासे उतरविताना नौकांमधील ठराविक अंतर हे अत्यंत शिस्तबद्ध असल्याचे मान्यवरांनी सांगून मुंबईतील मच्छीमारांच्या सांधिक समन्वयाबद्दल अभिनंदन केले. भाऊचा धक्का सीफूड सप्लायर्स असोसिएशनचे सचिव फैजल अल्वारे यांना त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत सखोल माहिती विचारण्यात आली. तसेच पाहणी दरम्यान महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल इमॅन्यूअल चॅसॉट, सेशेल्स यांनी विशेष उल्लेख केला.

000

दीपक चव्हाण/विसंअ