विधानसभा प्रश्नोत्तरे :

0
9

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मंत्री धनंजय मुंडे

नागपूर, दि. 14 : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला, तरी ती राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.

कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके, नाना पटोले, ॲड. आशिष शेलार, बबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

 

00000

श्री. दिपक चव्हाण/विसंअ/

——————————————————————————-

‘किसान’ योजनेतून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही– कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपूर दि. 14: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही. यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे ९६ लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी १२ ते १३ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.  पीएम किसान योजनेच्या  १४ व्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी, महसूल व भूमीअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या या अटींची पूर्तता करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

जे शेतकरी अल्प भूधारक  किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र, या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, अशी माहितीही मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या विषयावर सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही उपप्रश्न विचारले.

000

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

—————————————————————————–

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील अनियमिततेबाबत कारवाई करणार – मंत्री दिलीप वळसे पाटील

 नागपूर, दि. 14: राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात येईल. तसेच बँकेतील अनियमिततेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अधिकची माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, बँकेची अशा प्रकारची चर्चा झाल्यामुळे भितीपोटी बँकेतील सभासदांनी 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या. बँकेत 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत 1844 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेला कुठल्याही प्रकारे क्षती पोहचणार नाही, याची काळजी शासन घेईल. बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन पूर्णपणे बँकेच्या पाठीशी आहे.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाला कर्जाचे व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार संचालक मंडळाने कर्जाचे व्याजाचा दर ९ व १४ टक्के वरून ७ टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने एकूण १४ ठराव मंजूर केले आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेला ठराव दुरुस्त करायला सांगितले असून बँकेने सदर ठराव रद्द केले आहेत.

या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य श्रीमती यामिनी जाधव, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, हरिभाऊ बागडे, अजय चौधरी, बाळासाहेब पाटील यांनी भाग घेतला.

0000

श्री. निलेश तायडे/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here