वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

0
10

चंद्रपूर दि. 18 : वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी या शेतीविषयक विकसनशिल प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत, नागपूरचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, नोडल अधिकारी (स्मार्ट)  प्रज्ञा गोळघाटे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रीती हिरळकर, नोडल अधिकारी (स्मार्ट)  नंदकुमार घोडमारे, उपविभागीय कृषी अधिकारी तथा वरोराचे तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, भद्रावतीच्या तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी वरोरा तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कापूस उत्पादक शेतकरी विकास धेंगळे व भानुदास बोधाने यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकाच्या लागवडीचे वेळापत्रक व अर्थशास्त्र या दोन्ही बाबींवर चर्चा केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घेत कृषी विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर वरोरा तालुक्यातील मौजा एकार्जुना येथील उत्कृष्ट कापूस प्रकल्पास भेट दिली. या भेटीदरम्यान एकार्जुना संशोधन केंद्रात आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी बिटी व नॉनबिटी कापसाच्या विविध प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली. यावेळी सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञान, ट्रायकोकार्ड वापर व कामगंध सापळ्यांचा वापराबाबत चर्चा करण्यात आली. कापसाचे उत्पादन 30 ते 35 टक्के वाढीसाठी तसेच ठिंबक सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत डॉ.  गेडाम यांनी कृषी विभागास सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान डॉ. गेडाम यांनी जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, चिनोरा (ता. वरोरा) येथे भेट देऊन तेथील स्मार्ट प्रकल्पातंर्गत जिनिंग प्रेसिंग युनिटची पाहणी केली तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी शेती निगडीत विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा केली.

स्मार्ट प्रकल्पातंर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राची उभारणी प्रकल्पास भेट दिली. पीएमएफएमई (PMFME) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुनील उमरे यांच्या तेलघाणी युनिटचे उद्धाटन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या शेतावरील सेंद्रीय ऊस उत्पादन व सेंद्रीय गूळ निर्मिती केंद्रास भेट देण्यात आली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here