जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२१ :   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी ही सुविधा केंद्र आहेत.  परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कुशल मनुष्यबळ विकास देणे शासनाला शक्य होईल असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करारावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत जे उमदेवार परदेशात नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांना सर्व प्रकारचे रोजगाराभिमुख  प्रशिक्षण येथे दिले जाईल. जगातील प्रत्येक क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी ची माहिती मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याच प्रकारचे शिक्षण देणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडियाच्या माध्यमातून  देशभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत असेही श्री.लोढा यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांसाठी बदलत्या काळाची पाउले ओळखून कौशल्य  विकासाला बळ देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिलेले आहे.अनेक व विकसित देशांची उदा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, जपान येथे  कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. असे देश कुशल मनुष्यबळाची  मागणी करत आहेत. भारतातील सद्यस्थितीत तरूण वयोगटाचे प्रमाण ६२ टक्क्यावरून सन २०३० पर्यंत ६८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या  देशाला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांना याचा नक्की लाभ होईल असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दोन नवीन कार्यालयांचा आरंभ आणि महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या टेलिग्राम, व्हॉट्सअँप चॅनल, लिंक्डइनचा  आरंभ करण्यात आला.

व्हॉट्सअप चॅनल:https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38,

_LinkedIn Page_: https://shorturl.at/hpwQW अशा या लिंक आहेत.

या कार्यक्रमाला कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन.,व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी,कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ