‘मास औद्योगिक प्रदर्शना’चे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन

सातारा, दि.२१ :  सातारा जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून उद्योजकांनी उद्योग उभारणी करावी; यासाठी सर्व सोयी-सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

‘मास औद्योगिक प्रदर्शन – २०२३’ चे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मासचे जितेंद्र जाधव, राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले, अस्लम फरास, उद्योजक नितीन माने, श्रीकांत पवार,वसंत फडतरे, दिलीप उटकर आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, एखादा उद्योग जिल्ह्यातून बाहेर गेला मोठे नुकसान होते. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योग वाढले तर बरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. शासन उद्योग उभारणीसाठी सकारात्मक असून उद्योग वाढीसाठी नियमावलींमध्ये बदल केले आहेत.

‘मास’ने भरवेल्या प्रदर्शनाचा लाभ  होणार असून त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. सातारा जिल्हा उद्योग क्षेत्रामध्ये राज्यात पुढे कसा येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

आमदार श्री. भोसले म्हणाले, मासने भरविलेल्या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठा लाभ होणार आहे. सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग यावे यासाठी ‘मास’च्यावतीने प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रदर्शनात 150 स्टॉल लावण्यात आले .

या प्रदर्शनास उद्योजक, स्टॉलधारक,  नागरिक उपस्थित होते.

0000