कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्गाची हलकी, जड वाहतूक योग्य दुरूस्ती प्राथम्याने करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्गाची रेल्वे विभागाने कालमर्यादा निश्चित करून सर्वप्राथम्याने तात्काळ दुरूस्ती करावी. ही दुरूस्ती हलकी व अवजड वाहतूक करण्यायोग्य असावी. तसेच, सदर मार्गावरील नवीन पुलाचे बांधकाम करताना रेल्वे विभागाने सहा पदरी मार्ग करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, रेल्वे विभागाचे सहाय्यक विभागीय अभियंता सरोजकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पोलीस, वाहतूक व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी, दूरदृष्य प्रणालीद्वारे रेल्वेचे विभागीय अभियंता विकासकुमार उपस्थित होते.

नागरिकांची सुरक्षा व सुरळीत वाहतुकीस सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग हा मिरज व सांगली शहरांना महत्त्वाचा पूल व मुख्य मार्ग आहे. या पुलावरून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक होत असते. सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी कोणताही योग्य, सुरक्षित व सुव्यवस्थित, दोन्ही बाजूंनी जड वाहतूक करण्यायोग्य पर्यायी मार्ग नसल्याचे पोलीस व वाहतूक विभागाने कळविले आहे. त्यामुळे सदर पुलावरून हलकी व अवजड वाहतूक होण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने प्राथम्याने कालमर्यादा निश्चित करून या पुलाची दुरूस्ती करावी. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदर पूल हा ५५ ते ६० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. त्याचे आयुष्य साधारण ते ४० ते ५० वर्षांचे होते. त्यामुळे रेल्वे विभागाने ५ ते १० वर्षांपूर्वीच यावर विचार करणे आवश्यक होते. मात्र रेल्वे विभागाने अत्यंत विलंबाने कळविले असून, याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिले.

बैठकीतून भ्रमणध्वनीद्वारे या विषयाचे गांभीर्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कळविण्यात आले. तद्‌नंतर पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, या मार्गावर नवीन पूल करताना भविष्यातील २५ ते ३० वर्षांचा विचार करून सहा पदरी रस्त्याचे डिझाईन करावे. तसा प्रस्ताव व त्यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवावे. रस्ता दुरूस्ती व सहा पदरी रस्ता या दोन्हीबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. तद्नंतर गरज भासल्यास केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडेही सदर विषय मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सदर पूल दुरूस्त करताना गरज भासल्यास ४ ते ५ दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. मात्र, रेल्वे विभागाने त्यासंदर्भात किमान १५ दिवस आधी जिल्हा प्रशासनास पूर्वकल्पना द्यावी. तत्पूर्वी ज्या मार्गावरून वाहतूक वळवण्याचा पर्याय आहे, त्यांची दुरूस्ती व रूंदीकरण करून घेण्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी यांच्या स्ट्रक्चरल रिपोर्टवर रेल्वे, महानगरपालिका, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत चार दिवसांपूर्वी प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. आजच्या बैठकीत सूचविण्यात आल्याप्रमाणे पूल दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, वाहतूक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी मदत मिळेल. मात्र यापुढे अशा विषयांबाबत रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाशी आधी चर्चा करावी. तसेच, प्रत्यक्ष स्थळभेट करून पूल दुरूस्तीची कार्यवाही आजपासूनच सुरू करावी, असे त्यांनी सूचित केले. वाहतूक वळविण्यापूर्वी किमान १५ दिवस आधी प्रशासनास कळवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0000000