‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्त्वाची भूमिका बजावेल’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

0
4

मुंबई, दि. 26: पश्चिम आशियायी क्षेत्रात अर्थात ‘इंडो- पॅसिफिक’मधील सागरी सुरक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षेमध्ये भारतीय युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरते. या क्षेत्रातील सागरी सुरक्षेत भारतीय बनावटीची आयएनएस (इंडियन नेव्ही शीप) इम्फाळ ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले.

नेव्हल डॉकयार्ड, कुलाबा येथे आयएनएस इम्फाळ या युद्धनौकेचे जलावतरण संरक्षण मंत्री श्री. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौसेना प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाइस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, किरण देशमुख, माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल, आयएनएस इम्फाळचे कमांडिंग ऑफिसर कमलकुमार चौधरी आदी उपस्थित होते.

आयएनएस इम्फाळ ही आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असल्याचे सांगत संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले की, या युद्धनौकेच्या निर्मितीसाठी देशाच्या चारही भागातून सहकार्य मिळाले आहे. ही युद्धनौका म्हणजे भारताच्या एकता आणि अखंडतेचे उत्कृष्ट उदाहरण असून ब्राम्होस मिसाईलने सज्ज आहे. स्पीड गन, रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, सी गार्डियन्स, हेलिकॉप्टर सुविधेच्या सुसज्जतेसह ही युद्धनौका आहे. वैज्ञानिक, अभियंत्यांसह मजुरांनी एकत्र येऊन हे महाकाय काम साकारले आहे. देशाचे हित सर्वोतोपरी ठेऊन या युद्धनौकेची निर्मिती झाली आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीत एमएसएमई, स्टार्ट अप उद्योगांचेही सहकार्य लाभले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले, आयएनएस इम्फाळ केवळ समुद्रात उद्भवणाऱ्या भौतिक धोक्यांचा सामना करणार नाही, तर त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपली राष्ट्रीय एकात्मता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशविघातक कृत्यांना आळा घालेल. युद्ध हे कधी दोन देशांच्या सैन्यामध्ये होत नसते, तर दोन राष्ट्रात होते. त्यामुळे युद्धात संबंधित देशातील सर्व नागरिक सहभागी झालेले असतात. युद्धाचा त्या देशातील नागरिकांवर विपरीत परिणाम होत असतो.

हिंदी महासागर क्षेत्रात भारत ‘संपूर्ण सुरक्षा’ पुरवठादाराच्या भूमिकेत आहे. या प्रदेशातील सागरी व्यापार समुद्रापासून आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचेल, याची खात्री देतानाच संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले की, यासाठी मित्र देशांसोबत मिळून सागरी व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेऊ. देशाचा बराचसा व्यापार हा सागरी मार्गाने होतो. त्यामुळे सागरी मार्गांच्या सुरक्षिततेसाठी भारत काम करीत राहील. आयएनएस इम्फाळ भारताचे सागरी सुरक्षेमधील वाढते बळ दाखविते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’म्हणजे ‘जिसका जल, उसका बल’या आपल्या सिद्धांताला मजबुती प्रदान करते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माझगाव डॉक शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी आयएनएस इम्फाळचे महत्व विशद केले. नौसेना प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुरूवातीला संरक्षण मंत्री श्री. सिंह यांनी सन्मान गार्डचे निरीक्षण केले. तसेच त्यांच्या हस्ते जहाज पट्टीचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कॅप्टन श्री. चौधरी यांनी ‘कमिशनिंग ऑर्डर’चे वाचन केले. त्यानंतर युद्धनौकेवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘निशाण गार्ड’ने मान्यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी जहाजाच्या आतील भागाचे निरीक्षण केले. कार्यक्रमाला नौसेनेचे अधिकारी, माझगांव डॉकचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

मनिषा सावळे/निलेश तायडे, विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here