‘अंबिका’ मसालेच्या प्रणेत्या उद्योजिका कमलताई परदेशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनाने  ग्रामीण भागातील महिलांचा आधारवड कोसळला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, “लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायातून ग्रामीण महाराष्ट्राच्या मसाल्यांची अस्सल चव कमलताईंनी जगभर पोहोचवली. अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यामातून ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे, त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम त्यांनी केले. शेतमजूर ते उद्योजिका असा कमलताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. त्यांच्या निधनाने मराठी उद्योगजगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. परदेशी कुटुंबीयांसह अंबिका परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कमलताई परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

***