मुंबई, दि. 4 : आदिवासी जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी तसेच बांबू लागवडीतून व त्याच्या विविध व्यावसायिक उत्पादनातून आदिवासी भागाची नवी ओळख निर्माण व्हावी, यासाठी आदिवासी भागातील सामूहिक वन हक्काच्या जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज बांबू उत्पादन व त्यावर आधारित उत्पादकांबाबत बैठक घेण्यात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री डॉ.गावित म्हणाले की, बांबू व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यास आदिवासी परिसरातील स्थलांतर थांबेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. बांबू लागवडीमुळे आदिवासी भागातील अर्थचक्र बदलू शकते. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर नंदुरबार जिल्ह्यात बांबू लागवडीबाबतचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे. बांबू लागवड उपक्रमाबाबत तज्ञांची समिती गठित करण्यात यावी. या समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश संबंधितांना मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी दिले.
बांबू लागवडीचे भौगोलिक क्षेत्र, बांबू व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग, बांबू लागवडीसंदर्भात कार्यशाळा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) उपसचिव र. तु. जाधव, बांबू क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ डॉ. हेमंत बेडेकर, राजेंद्र सपकाळ, नीलेश मिसाळ, विनय कोलते, डॉ. मेधा जोशी, प्रिती म्हस्के आदी उपस्थित होते.
00000
शैलजा पाटील/विसंअ/