सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, वंचित, गरजूपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाह योजना, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना, अनुदानित शाळा, आयुष्मान भारत यासह सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या सांगली जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेतला.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सर्व समाजातील पात्र गरजू नागरिकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनाचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना द्यावा. त्याचबरोबर ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाने जनजागृती उपक्रम हाती घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू होती. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 650 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये केंद्र शासन पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती व पात्र वंचित गरजू लाभार्थींना लाभ देण्यासाठी आयोजित या संकल्प यात्रेच्या आयोजनाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले.
00000