मुंबई, दि. ८ : मुंबईतील एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक जाळे विस्तारणारा देशातील सर्वात मोठा सागरी पूल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ चे १२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला हा पूल सुमारे २२ कि.मी. लांबीचा असून समुद्रावरील त्याची लांबी सुमारे १६.५ किलोमीटर आणि सुमारे ५.५ किलोमीटर भाग जमिनीवर उन्नत मार्ग स्वरूपात आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल सेतू’ ह्या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे ह्या प्रकल्पाला ‘गेम चेंजर’ असेही संबोधले आहे. या प्रकल्पामुळे नव्याने रोजगारनिर्मिती होईल, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाचा व तिथल्या लोकांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास शक्य होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. मुखर्जी यांची मुलाखत गुरुवार दि. ११ आणि शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार, दि. १० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://x.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००